राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर : २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या सदस्य आणि अध्यक्ष पदांसाठीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसूचनेनुसार मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
आयोगाचे सचिव सुरेश कांकणवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठीची अंतिम प्रमाणित मतदार याद्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम ६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाला आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ असा ठेवण्यात आला असून, १६ नोव्हेंबर (रविवार) या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. सादर झालेल्या अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल.
उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
मतदानाची वेळ सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ते राज्य शासन राजपत्रात तत्काळ प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या घोषणेसह राज्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, स्थानिक राजकीय वर्तुळात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

