नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुणे शाखेकडून जवंजाळ यांचा जाहीर निषेध
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
पुणे:
नामदेव समाजोन्नती परिषद आणि संत नामदेव महाराज स्मारकाच्या कार्यावर आक्षेप घेत असलेल्या धनंजय जवंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर्तनाचा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुणे शहर शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणी समाज बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.
गेल्या काही दिवसांपासून काही लोकांकडून समाजाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर खोटे आरोप केले जात आहेत. संत नामदेव महाराज स्मारकाची संकल्पना माजी अध्यक्ष कै. सुधीर पिसे यांची होती, तर माजी सचिव कै. संजीव तुपसाखरे यांनी त्याचा पाठपुरावा केला. विद्यमान अध्यक्ष संजय नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाने स्वतःच्या पदरमोडीतून दिल्लीपर्यंतच्या दौऱ्या करत रेल्वेकडून स्मारकासाठी जागा मिळवली. मात्र, या यशाचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय क्षत्रिय एकसंघ संस्थेचे अध्यक्ष ॲड. महेश ढवळे आणि धनंजय जवंजाळ यांनी केल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आला आहे.
समाजश्रेष्ठींचा अपमान – संतप्त प्रतिक्रिया
या वादात समाजातील मान्यवरांवर देखील आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केशवराज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांना रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्याशी असभ्य भाषा वापरून धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, नामदेव समाज भूषण पुरस्कारप्राप्त ना.स.प. सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे, भाजप कार्यकारिणी सदस्य राजेश हेद्रे, अविनाश कुमठेकर, दिगंबरशेठ कुमठेकर, आशिष उंडाळे यांना केवळ मतभेद झाल्यामुळे ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. हे लोकशाही मूल्यांचे उल्लंघन असल्याची टीका करण्यात आली आहे.
पुण्यात जाहीर निषेध सभा
या पार्श्वभूमीवर नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुणे शहर शाखेने गुरुवार, ६ मार्च २०२५ रोजी नागेश पेठ, नामदेव शिंपी समाज मारुती मंदिर येथे विशेष सभा आयोजित केली. पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी या सभेत बोलताना, “समाज विघटन करणाऱ्या प्रवृत्तीचा प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा पातळीवर जाहीर निषेध केला जाईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
यावेळी पुणे विभागीय उपाध्यक्ष रणजीत माळवदे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके, सचिव सुभाष मुळे, कार्याध्यक्ष प्रदीप खोले, उपाध्यक्ष सुभाष पांढरकामे, अक्षय मांढरे, सोमनाथ मेटे, कुंदन गोरटे, मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, सहसचिव राहुल सुपेकर, खजिनदार शिवाजी माळवदकर, सहखजिनदार स्वप्निल खुर्द यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.
— संदीप लचके, अध्यक्ष, नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर