नगराध्यक्ष पदाची प्राथमिक स्पर्धा पाच महिलांमध्ये; छानणीत चार महिला अपात्र अर्ज माघारीनंतरच अंतिम समीकरणे स्पष्ट होणार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड दि. १८
म्हसवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या एकूण नऊ महिला उमेदवारांपैकी पाच महिलांचे अर्ज वैध ठरले असून चार उमेदवारांचे अर्ज छानणीत बाद झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या लढतीचे प्राथमिक चित्र आता पाच उमेदवारांमध्ये सीमित झाले असले, तरी अंतिम स्पर्धा उमेदवारी माघारीच्या मुदतीनंतरच स्पष्ट होणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस पूर्णत्वास गेल्यानंतर नगरपरिषदेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. बहुसंख्य इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरत उमेदवारीची चुरस निर्माण केली होती. नगराध्यक्ष पदासाठी देखील महिलांची लक्षणीय उपस्थिती नोंदवली गेली.

आज (दि. १८) पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मीना बाबर तसेच सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत अर्ज छानणी प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ अर्जांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुवर्णा सुनील पोरे, प्राजकता शुभम पोरे, जयमाला विशाल विरकर आणि कांता शंकर विरकर यांच्या अर्जांमध्ये अधिकृत पक्ष जोडपत्र नसल्याने ते अवैध ठरविण्यात आले.

दरम्यान पुजा सचिन विरकर (भाजप), भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रुपाली वाल्मिक सरतापे (बहुजन समाज पक्ष), गौरी विशाल माने (अपक्ष), आणि हिंदमालादेवी राजेमाने (अपक्ष) यांच्या उमेदवारी अर्जांना वैधता देण्यात आली.

उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असल्याने नगराध्यक्ष पदाच्या खऱ्या लढतीत नेमके किती उमेदवार टिकणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

छानणी प्रक्रिया काटेकोरपणे आणि टप्प्याटप्प्याने राबवली जात असल्याने एका प्रभागास छानणी करण्यास सुमारे एक तासाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

             पुजा सचिन विरकर (भाजप),
                  हिंदमालादेवी राजेमाने (अपक्ष)
                 गौरी विशाल माने (अपक्ष )
            रुपाली वाल्मिक सरतापे (बहुजन समाज पक्ष),

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *