महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), तालुका कृषी अधिकारी दहिवडी आणि कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाटकी, म्हसवड येथे आंबा पिक उत्पादनासाठी ‘दहा ड्रम पद्धतीचा वापर’ या विषयावर प्रात्यक्षिकांसह शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण श्री. अजित शिर्के यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय तज्ञ श्री. भूषणकुमार यादगीवार यांनी आंबा पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आंबा पिकाची काळजी, उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाचे श्री. सकटे सर यांनी सेंद्रिय शेतीमध्ये पशुसंवर्धनाचे महत्व स्पष्ट केले. सेंद्रिय शेतीला पशुपालन कसे पूरक ठरते, याची माहिती देत त्यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. याचबरोबर, सेंद्रिय शेती तज्ञ श्री. आबा लाड यांनी दहा ड्रम थेरी पद्धतीचे सविस्तर स्पष्टीकरण केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा, श्रीमती भाग्यश्री फरांदे मॅडम, तालुका कृषी अधिकारी श्री. अक्षय गार्डे, मंडल कृषी अधिकारी श्री. जयदीप बनसोडे यांच्यासह कृषि पर्यवेक्षक श्री. हरिभाऊ वेदपाटक, श्री. रामदास जाधव, कृषि सहाय्यक श्री. उत्तम तिकुटे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. राहुल कर्चे उपस्थित होते.
या चर्चासत्रात माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्रीमती भाग्यश्री फरांदे मॅडम यांनी ‘माणदेश केशर’ या नावाने आंबा पिकाचे ब्रॅण्डिंग करून त्याचे मार्केटिंग कसे करता येईल, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामदास जाधव यांनी केले आणि श्री. राहुल कर्चे यांनी उपस्थितांचे आभार मानले.