अनैतिक संबंधाच्या संशयावरून शेतकऱ्याचा खून; अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गणेशगाव पाटी येथे अंगावर शहारा आणणारी घटना
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
इम्रान मुल्ला :प्रतिनिधी
अकलूज (ता. माळशिरस) –
गणेशगाव पाटी, अकलूज येथे एका शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात संतोष बाळासाहेब वाघ (रा. लवंग, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची अकलूज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी बाळू सिन्नाप्पा वाघमोडे (वय ४०, रा. गुळवेनगर, अकलूज) यांनी दिलेल्या माहितीवरून, त्यांच्या वडिलांचा – सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे (वय ६०) – दिनांक १९ जून रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास ते २० जून रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, त्यांच्या शेतामधील नवीन बांधकाम सुरु असलेल्या बंगल्यात खून करण्यात आला.
संतोष वाघ याने फिर्यादीचे वडील व एका शेतमजूर महिला नूतन जाधव यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन रागाच्या भरात धारदार हत्याराने डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर, पायावर, व छातीवर वार करून खून केल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी भा.दं.वि. कलम 103(1), 352, 351(3) अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 447/2025 अन्वये नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि चौधरी करीत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सपोनि लंगुटे यांच्या हस्ते करण्यात आली.
पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.