व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी नुकत्याच संपन्न झालेल्या सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथयात्रेनिमित्त प्रवासी वाहतुकीसाठी राज्य परिवहन विभागाने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल स्थानिक मान्यवरांच्या हस्ते परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. म्हसवड येथील रथयात्रेसाठी लाखोच्या पटीत भाविक येत असतात. त्यामुळे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने राज्य परिवहन विभागावर मोठी जबाबदारी असते. सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी आगार प्रमुख कुलदीप डुबल यांनी आपल्या सर्व स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने एसटी फेऱ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते . 91 विशेष एसटी बसेस च्या माध्यमातून स्थानिक रित्या 200 पेक्षा जास्त फेऱ्या करून हजारो प्रवाशांना वाहतूक सोयी पुरविल्या बद्दल क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक कृषिरत्न प्रा विश्वंभर बाबर , पत्रकार पोपट बनसोडे, व विजय भागवत , युवा नेते समर्थ जाधव वाहतूक नियंत्रक म्हसवड प्रवीण कोळी व विश्वास माने यांचे हस्ते सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे दहिवडी आगार प्रमुख कुलदीप डुबल तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वंभर बाबर यांनी म्हसवड बस स्थानकातून प्रवासी हितासाठी काही नवीन बसेस सुरू करण्याची तसेच म्हसवड आगारासाठी वाढीव सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली . त्यावर अग्रक्रमाने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. सुदैवाने माझे व कुलदीप डुबल यांचे कुलदैवत श्री सिद्धनाथ असल्याने म्हसवड वासियांना एसटी वाहतूक सोयी सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे रोहन पलंगे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती ज्योती गायकवाड , विकास माने, रेश्मा गाडेकर ,दत्ताजीराव मोरे ,तेजससिंह नवले ,भूषण सूर्यवंशी, इत्यादी जिल्हास्तरीय एस.टी चे अधिकारी तसेच कुलदीप डुबल, प्रवीण कोळी, विश्वास माने इत्यादी स्थानिक अधिकारी उपस्थित होते. या निमित्ताने म्हसवड आगारातील कार्यतत्पर कर्मचारी माणिक झगडे यांचा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. रथयात्रेनिमित्त प्रवासी हित जपल्याचे समाधान तसेच स्थानिक मान्यवरांनी केलेल्या सन्मानाबद्दल दहिवडी आगार प्रमुख कुलदीप डुबल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.