उंब्रज पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
प्रतिनिधी: कुलदीप मोहिते, उंब्रज (ता. कराड)
उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यतत्पर पथकाने चोरीप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून ३६ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या जलद आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर ७०/२५ अन्वये अज्ञात आरोपीविरोधात फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या बंद घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चोरट्यांनी चांदीचे दोन छल्ले व HP कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
तपासदरम्यान गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे उंब्रज पोलिसांनी लक्ष्मी नगर, उंब्रज येथील संकेत संतोष चव्हाण (वय २०) या संशयितास ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले चांदीचे दोन छल्ले व लॅपटॉप असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तसेच कराड उपविभागीय अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे, पीएसआय रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार सचिन मुळे, संजय धुमाळ, दिनेश भोसले, कॉन्स्टेबल प्रशांत पवार, श्रीधर माने, मयूर थोरात आणि राजू कोळी यांच्या पथकाने केली.
या तातडीच्या व यशस्वी कारवाईबद्दल उंब्रज पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.