महाराष्ट्र राज्य शिंपी समाजाच्या आर्थिक विकासासाठी मोठा निर्णय घेत आजच्या कॅबिनेट बैठकीत शिंपी समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना जाहीर करण्यात आली. शिंपी समाजाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे.
समस्त शिंपी समाजाच्यावतीने नामदेव समाजोन्नोती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे व लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महामंडळ स्थापनेची मागणी केली होती. या मागणीला पाठिंबा देत आमदार जयकुमार गोरे यांनी शासन स्तरावर याबाबत तातडीने कार्यवाही केली.
महाराष्ट्रात सुमारे ६५ लाख शिंपी समाजबांधव विविध पोटजातींमध्ये विखुरलेले आहेत. आपल्या पारंपरिक कापड व शिलाई व्यवसायात गुंतलेल्या या समाजाला आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. इतर समाजांसाठी जसे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले, त्याच धर्तीवर शिंपी समाजासाठी देखील महामंडळ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून इंजि. सुनील पोरे यांनी या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे शिंपी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने नवी दिशा मिळेल, असे सर्व स्तरातून व्यक्त केले जात आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, भाजप ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष करण पोरे, सिध्दार्थ गुंडगे, नामदेव चांडवले, जयकुमार शिंदे, विठ्ठल बलशेटवर, निलेश माने, विकास गोसावी यांसह संत नामदेव शिंपी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे शिंपी समाजाच्या विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे