म्हसवड शहरात विजेचा लपंडाव — नागरिक, व्यापारी व लघुउद्योग हैराण “लोडशेडिंग नसताना वारंवार वीज खंडित का?” — माजी नगराध्यक्ष नितीन दोशी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) –
म्हसवड शहरात गेल्या दहा–पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, व्यापारी,शेतकरी तसेच छोटे व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) अधिकृत लोडशेडिंग नसतानाही, दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
म्हसवड शहरातील रहिवाशांच्या मते, सकाळी घरगुती कामे सुरू होताच अचानक वीज जाते, तर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी दुकाने आणि लघुउद्योग अंधारात बुडतात. त्यामुळे वेल्डिंग, प्रिंटिंग, सलून, कोल्ड-ड्रिंक्स, इलेक्ट्रिक वर्कशॉप, तसेच मेडिकल दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.
माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी व्हिजन २४ तास न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,
“महावितरणकडून शहरात लोडशेडिंग लागू नसतानाही वीज वारंवार बंद केली जात आहे. कोणत्याही नियोजित देखभालीची पूर्वसूचना नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यास बिघडतात,दिवाळी सिझन सुरु असल्याने ग्राहकांची पेठेत गर्दी असून व्यापाऱ्यांचे नुकसान होते, आणि प्रशासन मात्र मौन आहे.”
दोशी यांनी पुढे सांगितले की, जर महावितरणकडे तांत्रिक अडचणी असतील तर त्याबद्दल शहरवासीयांना पारदर्शक माहिती दिली पाहिजे. “आता वीजपुरवठा स्थिर नसेल, तर नागरिकांच्या तक्रारी घेऊन आम्ही आंदोलनाच्या मार्गावर जाऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले की,
“सकाळी दुकान उघडले की लगेच लाईट जाते, थोड्या वेळात येते आणि पुन्हा बंद होते. अशा परिस्थितीत लघुउद्योग कसा चालवायचा? बिल वेळेवर भरावे लागते पण सेवा मात्र अधूनमधूनच मिळते.”
म्हसवड विभागाच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र स्थानिक सूत्रांनी सांगितले की, काही भागात लाइन मेंटेनन्स व जुने ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित होत आहे.
शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाने एकमुखाने मागणी केली आहे की,
विजेच्या बंदोबस्ताचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे,
अचानक वीज खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी,
जर देखभाल सुरू असेल तर तिची पूर्वसूचना सोशल मीडियाद्वारे व स्थानिक पत्रकांद्वारे दिली जावी.

