व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड, – माण तालुक्यातील प्रलंबित ताबा प्रस्तावांची वेळेत कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे निमंत्रित सदस्य नितिन दोशी यांनी म्हसवड तलाठी कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला आहे. अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. म्हसवडच्या वतीने हा ताबा प्रस्ताव दि. ०१ जुलै २०२४ रोजी प्रांत कार्यालयाकडून तहसीलदार कार्यालयास पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर ३० जुलै रोजी अहिंसा पतसंस्थेने पत्र देऊन त्वरीत कार्यवाहीची मागणी केली होती. मात्र, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही.
पतसंस्थेचे वसुली अधिकारी श्री. मुजावर यांनी संबंधित विभागातील लिपिक श्री. कुलकर्णी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत श्री. मुजावर आणि व्यवस्थापक श्री. मासाळ यांनी तहसीलदार कार्यालयातील बारनिशी विभागात भेट घेतली होती, तरीही प्रस्ताव प्रलंबित आहे.
ताबा प्रस्तावांच्या विलंबामुळे पतसंस्थेच्या वसुलीवर गंभीर परिणाम होत असून, संस्थेच्या आर्थिक कारभारात अडथळे निर्माण होत आहेत. या परिस्थितीत, नितिन दोशी यांनी पत्राद्वारे तहसीलदार यांना विनंती केली आहे की, ताबा प्रस्तावांची कार्यवाही तातडीने करावी आणि विनाकारण विलंब करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता म्हसवड तलाठी कार्यालया समोर उपोषण करनार असल्याचे नितीन दोशी यांनी सांगितले