डॉ. पतंगराव कदम यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपण राजकारण शिकलो त्यांचे राजकीय मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच बहुमोल ठरले :आ.जयकुमार गोरे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड : प्रतिनिधी

शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकावर आज माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे यांनी असंख्य पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसह पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

डॉ. पतंगराव कदम यांच्या अथक परिश्रमांनी आणि आत्मनिर्भरतेच्या ध्येयाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. आमदार गोरे यांनी त्यांच्या सोबतच्या जीवनातील अनेक प्रसंग आठवत, साहेबांच्या कार्यप्रणालीतून मिळालेली ऊर्जा आणि शिकवण याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

शेती हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे हे लक्षात घेऊन जयकुमार गोरे यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसोबतच पाण्याच्या योजनांवरही काम केले. उरमोडी आणि जिहे-कठापूर सिंचन योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि दुष्काळमुक्तीच्या लढाईत अंतिम टप्पा गाठल्याचे सांगितले.

डॉ. पतंगराव कदम यांच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक करत, गोरे यांनी त्यांच्या भाषणशैलीने नेहमीच लोकांना खळखळून हसवले आणि कार्यक्रमात उपस्थितांचे लक्ष वेधले असल्याचे नमूद केले. कदम साहेबांनी कधीही कोणालाही मोकळ्या हाताने परत पाठवले नाही, असे सांगत त्यांनी त्यांचे राजकीय मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच बहुमोल ठरल्याचे गोरे म्हणाले.

डॉ. पतंगराव कदम यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपण राजकारण शिकल्याचे सांगत, त्यांचे योगदान आणि मार्गदर्शन आजही ऊर्जास्त्रोत म्हणून कार्यरत असल्याचे आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!