व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, प्रतिनिधी:
भारताचे माजी पंतप्रधान आणि थोर अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा, म्हसवड येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, शैक्षणिक संकुलातील शिक्षक, आणि हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान: कार्यक्रमादरम्यान विश्वंभर बाबर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील योगदान, जागतिक मंदीच्या काळात देशाला आर्थिक संकटातून सावरणारे त्यांचे नेतृत्व आणि शिक्षण हक्क, माहिती अधिकार, खाद्यान्न सुरक्षा, मनरेगा यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांची मांडणी यावर प्रकाश टाकला.
“राजकारणात असूनही राजकारणापलीकडे जाऊन काम करणारा असा नेता म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख आहे,” असे बाबर यांनी उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. सिंग यांच्या कार्याचा आदर व्यक्त करणाऱ्या शोकसभा आणि मौन पाळून करण्यात आला.