दारूच्या व्यसनातून घरगुती वाद विकोपास : पत्नी, मुलगा व मुलीकडून मारहाण; पतीचा मृत्यू
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज (प्रतिनिधी):
पाटण तालुक्यातील सवारवाडी गावात घरगुती वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी, मुलगा आणि मुलीने संगनमत करून पतीला लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली असून, यात पतीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेश कोंडीबा खरात (वय ४५) असे मयताचे नाव असून, त्याच्या पत्नी, मुलगा आणि मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे संपूर्ण घटनाक्रम असे घडले:
उंब्रज पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई राजकुमार कोळी यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, दि. २६ जुलै रोजी रात्री ११ वाजता डायल ११२ वर एक कॉल प्राप्त झाला होता. सवारवाडी (ता. पाटण) येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, कोणीतरी त्याला मारल्याची शंका कॉल करणाऱ्याने व्यक्त केली होती.
त्यावरून डायल ११२ पथकाचे पोलीस सवयीप्रमाणे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी रमेश खरात हे बेशुद्धावस्थेत घरात पडलेले आढळून आले. शरीरावर हातपायावर गंभीर जखमा होत्या. त्यांचे वडील कोंडीबा खरात, मुलगा हरिष व पत्नी लक्ष्मी यांच्यासह मुलगी अश्विनी शिंदे (रा. नागठाणे) हे नातेवाईक घरात उपस्थित होते.
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, अधिक विचारणा केल्यावर वडील व मुलाने कबूल केले की, रमेश हे दारूचे आहारी गेलेले असून, घरात सतत वादविवाद करत असत. त्यांनी पत्नीला व मुलीला दि. २५ जुलै रोजी किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी, हरिष व अश्विनी या तिघांनी मिळून त्याला लाकडी दांडक्याने तसेच हाताने जबर मारहाण केली.
उपचाराअभावी मृत्यू :
२६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास झालेल्या मारहाणीनंतर रमेश खरात बेशुद्धावस्थेत घरातच पडून होते. दुपारी १.०० वाजेपासून ते बेशुद्धच होते, मात्र नातेवाईकांनी कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही. २७ जुलै रोजी सकाळी नागठाणे येथून अॅम्ब्युलन्स बोलवून त्यांना कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर खबाले यांनी मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करून शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदन अहवालात मयताचे हात, पाय आणि शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून, अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीसांनी पत्नी लक्ष्मी खरात, मुलगा हरिष व मुलगी अश्विनी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तारळे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.