श्री सिध्दनाथ, माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचा दिपावली पाडव्यास शुभारंभ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने
म्हसवड ( प्रतिनिधी )
अनेक राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी या देवतांचा पारंपारिक ,शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्यामुहूर्तावर – मंदीरात श्री ची घटस्थापना करुन करण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदा ते मार्गशिर्ष महिन्यातील प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा श्रींचा हा मंगलमय शाही विवाह सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो.
मंगळवारी दिपावली पाडव्यास पहाटे साडेपाच वाजता श्रींची घटस्थापना,त्याच दिवशी दुपारी अकराच्या दरम्यान श्रींच्या हळदीचा कार्यक्रम व भाऊबिजे दिवशी सायंकाळी दिवाळी मैदान, तुलसी विवाहा दिवशी रात्री बारा वाजता श्रीं चा विवाह सोहळा व विवाह सोहळ्यानंतर देवदिवाळीस वधू वरांची वरात रथातून काढून या शाही विवाह सोहळ्याची सांगता रथयात्रेने केली केली जाते.
दिपावली पाडव्यास मंगळवारी ( ता.14 ) प्रातकाळी मंदीरामधील मुख्य गाभा-याबाहेरील मंडपातील श्री म्हातारदेव मुर्तीच्या समोर मंदीराचे मानाचे सालकरी यांचे हस्ते यासोबत मंदीराचे पुजारी, मानकरी,सेवेकरी,भाविक यांचे उपस्थितीत घटस्थापना करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी 11 वाजता परंपरागत श्रींच्या मुर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम होईल.
यावेळी मंदीरातील पादुका मंडपात सालकरी महेश गुरव त्यांची पत्नी सौ.राणी सपत्नीक सोबत परटीण कुरवली,चार सुहासिनी महिलां,श्रींचे पाळेकरी पुजारी,गुरव,घडशी व डवरी इत्यादी समवेत साध्या पध्दतीने संपन्न होताच श्री वर सिध्दनाथ,, वधू माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मुर्तींना स्नान घालून त्या पुर्ववत मुख्य गाभा-यातील श्रीच्या मुख्य मुर्तीनजिक स्थानापन्न करण्यात येणार आहेत.
श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्यातील हळदी लावण्याच्या कार्यक्रमास म्हसवड नगरीतील विशेत: भाविक महिलांची उपस्थिती हजारोंच्या संख्येने असते.
हळदी लावण्याचा कार्यक्रम संपन्न होताच सालकरी पुजारींसह भाविकांच्या पारंपरिक पध्दतीने बारा दिवसाच्या नवरात्री उपवासा समवेतच संपूर्ण नगरप्रदक्षणा उपक्रमास प्रारंभ करण्यात येणार आहे.
या नगरप्रदक्षिणा उपक्रमात प्रत्येक वर्षी सुमारे पाचशे ते एक हजार संख्येने भाविक सहभागी होत असतात.
सलग बारा दिवस हा उपक्रम मंदीरातील सालकरी ,गुरव व मानकरी यांचा सुरु राहतो.
श्री सिध्दनाथ हे देवस्थान काशी विश्वेश्वर येथील काळभैरव देवस्थानचा अवतार मानला जातो.
यामुळे मंगळवारी (ता.5 डिसेंबर ) मंदीरात कालाष्टमी म्हणजेच भैरव जयंती साजरी केली जाणार आहे.
बुधवारी (ता.15 नोव्हेबर ) भाऊबिजेस या शाही विवाह सोहळ्या निमित्त येथील राजबागेतील पुरातण श्री म्हातारदेव मंदीरात सालकरी पुजारी व मानकरी समवेत मिरवणुकीने भेटीचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे ही मिरवणुक ‘दिवाळी मैदान’ म्हणून सर्वपरिचित असुन या मिरवणूकीपुढे म्हसवड नगरीतील भाविक ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जोपासली गेली आहे. सायंकाळी पाच वाजता मंदिरातून मार्गस्थ झालेली ही मिरवणुक दुस-या दिवशी पहाटेच्या सुमारास मंदीरात पोहचते.
शुक्रवारी (ता.24 नोव्हेंबर ) तुलसी विवाह दिवशी रात्री बारा वाजता श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या शाही विवाह सोहळ्याची सांगता देवदिवाळीस बुधवारी ( ता.13 डिसेंबर ) श्रींच्या मुर्तींची रथातून मिरवणूकीने केली जाणार आहे.
या पारंपारिक रथ मिरवणूक यात्रेच्या कार्यक्रमास प्रत्येक वर्षी राज्यासह परराज्यातील सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते.
कोट
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान पारंपारिक शाही विवाह सोहळ्याचा कार्यक्रम
बुधवार ता.14 नोव्हेंबर दिपावली पाडवा मुहूर्तावर पहाटे पाच वाजता
श्रींची घटस्थापना व सकाळी 11 वाजता हळदी लावण्याचा कार्यक्रम
भाऊबिजेस बुघवारी ( ता.15 नोव्हेंबर ) सायंकाळी पाच ते गुरुवार (ता.16 )पहाटे पर्यंत “दिवाळी मैदान” “मिरवणुक
शुक्रवार (ता.24 नोव्हेंबर)
रात्री बारा वाजता श्रींचा पारंपारिक शाही विवाह सोहळा
मंगळवार (ता.5 डिसेंबर )
श्री सिध्दनाथ कालाष्टमी,,,जयंती कार्यक्रम
बुधवार ता.13 डिसेंबर दुपारी बारा वाजता रथ नगरप्रदक्षिणा मिरवणुक यात्रेने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता.