मेरीमता हायस्कूल, म्हसवड येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर, रवी पाटील सर, बोबडे सर, फादर सनू, क्रीडा शिक्षक आकाश सर आणि संतोष सर उपस्थित होते. याशिवाय म्हसवडमधील विविध मान्यवरांचा सहभाग होता,
जिल्ह्यातील विविध शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार श्री. जयकुमार गोरे यांनी त्यांच्या भाषणात योगासनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “मी स्वतः एक खेळाडू राहिलो आहे आणि खेळांचे आपल्या जीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगासन ही भारताची अनमोल देणगी आहे, आणि दररोज काही वेळ योगासनांवर खर्च करणं ही काळाची गरज आहे.”
आमदारांनी पुढे सांगितले की, “दररोज व्यायाम केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही.” त्यांनी मेरीमाता हायस्कूलच्या सततच्या नव्या उपक्रमांचे कौतुक केले व शाळेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शूटिंग रेंजमध्ये त्यांनी नेमबाजीचा अनुभव घेतला आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचेही अभिनंदन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर यांनी सर्व उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व योगासनांसारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हांडे सर यांनी केले आणि संजय शर्मा सर यांनी आभार प्रदर्शन केले.