व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) पुणे :प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट आणि स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड (SCAW, कॅनडा) यांच्या संयुक्त विद्यमाने, वैभव पोरे (मुख्य कार्यक्रम समन्वयक, रोटरी & SCAW – कॅनडा) यांच्या मार्गदर्शनाखाली, दौंड आणि आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्लीपींग व स्कूल किट वाटप करण्यात आले.
५ फेब्रुवारी २०२५ रोजी यवत (दौंड) येथे ६७५ विद्यार्थ्यांना, तर ६ फेब्रुवारी रोजी गोहे बु (आंबेगाव) येथे ६९८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी अंदाजे ६ हजार रुपये बाजारमूल्याच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे ४६ वस्तूंचा समावेश असलेल्या किट्सचे वितरण करण्यात आले. यामध्ये चटई, सतरंजी, बेडशीट, उशी, सोलापूरी चादर, पोलर ब्लँकेट, शूज-सॉक्स, स्वेटर (हुडी), नाईट ड्रेस, योगा मॅट, स्टेशनरी साहित्य आणि इतर उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे. एकूण १,३७३ विद्यार्थ्यांना सुमारे ८२.५ लाख रुपये किमतीच्या किट्स देण्यात आल्या.
यावेळी SCAW कॅनडाच्या टीमचे चार सदस्य, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीसाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महंमदवाडी, हडपसर) यांचे सहकार्य लाभले. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात येणार असून, ज्यांना गरज असेल त्यांची पुण्यात मोफत नेत्रशस्त्रक्रिया केली जाणार आहे.
वैभव पोरे यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान एकूण सात ठिकाणी असे उपक्रम राबवले जाणार असून, सुमारे ५,००० विद्यार्थ्यांना ३ कोटी रुपये किमतीचे साहित्य वितरित केले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल.