अनुदानित युरियाच्या विक्रीत गडबड : म्हसवडमधील ‘बाप्पा कृषी सेवा केंद्रा’वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताच्या विक्रीमध्ये गंभीर अनियमितता करत शासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसवड येथील ‘बाप्पा कृषी सेवा केंद्र’ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने १८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता म्हसवड येथील पंढरपूर रोडवरील ‘बाप्पा कृषी सेवा केंद्र’ येथे छापा टाकून तपासणी केली. या कारवाईत युरिया खत प्रति गोणी ३०० रुपयांना विक्री होत असल्याचे आणि त्या विक्रीसोबत अन्य निविष्ठांचे बळजबरीने ‘लिंकींग’ स्वरूपात विक्री केली जात असल्याचे आढळून आले.

दुकानात उपस्थित दुकानदार मंगेश अशोक सावंत (रा. म्हसवड), त्यांचे कामगार रोहन खांडेकर आणि काही शेतकरी यांच्यासमक्ष ही विक्री होत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी युरिया विक्रीसाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, शासनाच्या अनुदानित योजनेचा दुरुपयोग झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी श्रीमती शितल रामचंद्र घाडगे (रा. दहिवडी) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानदार मंगेश सावंत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पळे मॅडम करत आहेत.

या कारवाईत जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष श्री. गजानन ननावरे (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सातारा) आणि श्री. संजय फरतडे (जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, सातारा) हेही सहभागी होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा अनियमित विक्री करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!