म्हसळा चेक पोस्टवर दिशादर्शक फलकांची तातडीची गरज

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसळा | प्रतिनिधी : सुशील यादव

दिघी–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील म्हसळा चेक पोस्ट हा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रवेशद्वार मानला जातो. याच ठिकाणी माणगाव, श्रीवर्धन व गोरेगावकडे जाणारे प्रमुख राज्य मार्ग एकत्र येत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावरून होते. तसेच याठिकाणी म्हसळा पोलीस ठाण्याचा चेक पोस्टही असूनही परिसरात आवश्यक दिशादर्शक फलकांचा ठोस अभाव जाणवत आहे.

एमएसआरडीसीमार्फत खाजगी विकासकांनी हा रस्ता विकसित केला असला तरी गेल्या दहा वर्षांपासून चेक पोस्ट परिसरात उभारण्यात आलेल्या खांबांवर एकाही दिशादर्शक पाटीची बसवणूक न झाल्याने वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काँक्रीट रस्ता तयार होऊन दशक उलटले तरी संबंधित विभागाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याची स्थानिकांची नाराजी आहे.

सध्या सुरू असलेल्या पर्यटन हंगामात श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आदी पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी म्हसळा चेक पोस्ट परिसरात पोहोचल्यावर योग्य मार्ग ओळखण्यात अनेक वाहनचालक गोंधळात पडतात. मुंबई–गोवा महामार्गाकडे वळण्यासाठी कोणता मार्ग घ्यायचा हे स्पष्ट न झाल्याने अनेकांना चुकीच्या दिशेने जावे लागते. काहीवेळा चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी नसल्याने ही गैरसोय अधिकच वाढते.

या पार्श्वभूमीवर म्हसळा येथील रहिवासी व स्वयंसेवक प्रसाद जवळे यांनी संबंधित विभागांना तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. चेक पोस्ट येथे स्पष्ट, वाचनीय व दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत, अशी त्यांची जोरदार मागणी आहे. योग्य दिशादर्शक फलक उभारल्यास प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होऊन वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *