दिघंची गायरान जमीन वाद : बहुजन समाज पार्टीचे आटपाडी तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
सचिन मेनकुदळे
दिघंची, प्रतिनिधी
मौजे दिघंची (ता. आटपाडी) येथील शासकीय गायरान गट क्रमांक 771/1 मधील विना परवाना सुरु असलेल्या MSEB सब स्टेशनच्या बांधकामाविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज, सोमवार ३० जून २०२५ पासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
पक्षाचे खानापूर-आटपाडी विधानसभा अध्यक्ष मा. संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून, शासकीय गायरान जमिनीवरील कोणतीही अधिकृत कब्जेपट्टी, फेरफार किंवा हमीपत्र सातबारा उताऱ्यावर नोंदवलेले नसतानाही बांधकाम सुरु करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी विटा, तहसीलदार आटपाडी व पोलीस निरीक्षक आटपाडी यांना निवेदन देऊन बांधकाम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे बहुजन समाज पार्टीने जाहीर केले.
पक्षाच्या प्रमुख मागण्या:
1. गट क्र. 771/1 वरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे.
2. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
3. सदर गट गावातील गुरे चरणे व सार्वजनिक उपयोगासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावा.
पक्षाच्या मार्गदर्शक मा. बहनकुमारी मायावती यांच्या विचारांनुसार जनतेच्या हक्कासाठी लढा देत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संतोष हेगडे यांनी दिला आहे.

