माण-खटाव तालुक्यातील विकास कामांचा वेध; मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सातारा, /म्हसवड –
माण आणि खटाव तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत त्यांनी वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या माण तालुक्यातील भोजलिंग, टाकेवाडी, वारुगड येथील रस्त्यांच्या कामांबाबत बोलताना, “रस्तेसाठी निधी मंजूर आहे. त्यामुळे वन विभागाने त्वरित परवानगीप्रक्रिया पूर्ण करून कामांना गती द्यावी,” असे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीला आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा परिषदेचे अभियंता अमर नलावडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील कटगुण आणि भोसरे येथील पर्यटन विकास आराखडे तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, अशी सूचना मंत्री गोरे यांनी केली. तसंच शिंगणापूर, म्हसवड, सिद्धेश्वर कुरोली आणि पुसेगाव येथील ब वर्ग तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे, आंधळीचे महालक्ष्मी मंदिर, पांगारीचे बिरोबा मंदिर आणि फलटण तालुक्यातील मरुम येथील मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ यांना ‘क’ वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.
बैठकीत माण-खटाव तालुक्यातील पाझर तलावांमधून गाळ काढण्याचे काम सुरू करण्यावरही चर्चा झाली. इंधनासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून द्यावा, असे मंत्री गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
या बैठकीत दोन्ही तालुक्यांसाठी विकासाचे नवे मार्ग निश्चित करण्यात आले असून, पुढील काळात या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.