व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड येथील क्रांतीनगर वडार गल्ली भागातील नागरिकांनी परिसरातील गटार नसल्यामुळे सांडपाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सध्या या भागातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे म्हसवड शहराध्यक्ष मा.श्री. सचिन शांताराम माने यांनी या समस्येवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेकडे मागणी केली आहे. त्यांनी नगरपरिषदेस सादर केलेल्या निवेदनात सांगितले की, क्रांतीनगर येथील शालन माने ते सुमन मदने यांच्या घरापर्यंतचा रस्ता सांडपाण्यामुळे दूषित झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, म्हणून या ठिकाणी तात्काळ १ फुटी सिंमेट पाईप टाकून गटार व्यवस्था निर्माण करावी व रस्त्यावर मुरमीकरण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मा.श्री. माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी त्वरित उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.