म्हसवडसाठी जिल्हा उप रुग्णालयाची मागणी – प्रा. विश्वंभर बाबर यांचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना निवेदन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
म्हसवड, ता. माण (प्रतिनिधी):
म्हसवड परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्य गरजा लक्षात घेता, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून जिल्हा उप रुग्णालय मंजूर करण्याची जोरदार मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.

यासंदर्भातील अधिकृत लेखी निवेदन प्रा. बाबर यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रालयात दिले. या निवेदनात म्हटले आहे की, म्हसवड हे नगरपालिकेचे केंद्र असून त्याचे क्षेत्रफळ विस्तृत आहे. सध्या नगरपालिकेची लोकसंख्या सुमारे ४२,००० इतकी आहे, तर म्हसवड पोलीस ठाण्याच्या अखत्यारितील गावांसह एकूण लोकसंख्या सुमारे २.७५ लाख इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीसाठी सध्या केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध असून, ते अपुरे ठरत आहे.

प्रा. बाबर यांच्या मते, या भागातील नागरिकांना गंभीर आजार, अपघात वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा उप रुग्णालय मंजूर होणे ही काळाची गरज आहे.

या मागणीसाठी यापूर्वीही म्हसवड नगरपालिकेच्या शिफारशीसह जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आल्याचेही प्रा. बाबर यांनी सांगितले. या प्रस्तावाची प्रगती जलद गतीने व्हावी म्हणून राज्यस्तरीय पाठपुरावा करत आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनीही या मागणीची गंभीर दखल घेत, संबंधित विभागाकडून प्रस्ताव तातडीने मागवून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती प्रा. बाबर यांनी दिली.

म्हसवड शहरासह परिसरातील नागरिकांसाठी ही एक आशादायक आणि महत्त्वाची घडामोड ठरणार असून, लवकरच या भागाला उत्तम आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!