पत्रकारांच्या मदतीने मुखवटेधारक मद्यधुंदाना जेरबंद करण्यात दहिवडी पोलिसांना यश
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले, :
सुसाट वेगाने निघालेल्या कारचा थरारक पाठलाग करत पत्रकारांच्या मदतीने मुखवटेधारक मद्यधुंदाना जेरबंद करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले.मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टाळल्याची घटना दहिवडीत घडली.
बुधवारी (काल) दुपारी म्हसवड कडून सुसाट वेगाने स्वीप्ट कार दहिवडीच्या दिशेने निघाली होती. यावेळी गोंदवल्यातील मुख्य चौकातील गर्दीत कारचा वेग मंदावला अन कार मधील युवकांचा अवतार बघून सर्वजण चक्रावले.कारमध्ये बसलेल्या तरुणांनी आपले चेहरे मनुष्याच्या मुखवट्यानी झाकले होते. शिवाय डोळ्यावर गॉगल देखील चढवले होते. वाहनातील तरुणांचा हा अवतार बघून चौकात उभ्या असलेल्या बापूसाहेब मिसाळ,संदीप जठार,फिरोज तांबोळी,एकनाथ वाघमोडे व नितीन वाघमोडे या पत्रकारांना संशय आला.त्यांनी तातडीने दहिवडी पोलिसांना माहिती देत कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचे पथक लगेच या कारच्या शोधार्थ रवाना झाले.मात्र सुसाट कारचालकाने दहिवडीच्या गर्दीतून बेदकारपणे गाडी चालवून सर्वानाच चकवा देत फलटणच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.या कारच्या मागावर पोलिसांसह पत्रकार होतेच.त्यात दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे देखील पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड,महेश शिंदे,लखन बोराटे यांच्यासमवेत सहभागी झाले.हा मोठा ताफा आपल्या मागावर पोलीस असल्याचे लक्षात येताच या कार चालकाने मुख्य रस्ता सोडून देत आडरस्त्याने गाडी नेण्यास सुरुवात केली.मात्र काही अंतरावरच त्यांना पकडण्यास पोलिसांना यश आले.
या थरारक पाठलगानंतरही कारमधील सर्वांच्या चेहऱ्यावर मुखवटे होतेच.तसेच हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते.पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुखवटाधरी व मद्यधुंद कारचालकाबाबत समयसूचकता दाखवून पुढील अनर्थ टाळण्यास पोलिसांना पत्रकारांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे.———अक्षय सोनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहिवडी
मुखवटाधारी कार चालकबद्दल संशय आल्याने समाजहित लक्षात घेऊन आम्हा पत्रकारांना पोलिसांना मदत करता आली याचे खूप समाधान मिळाले.—–बापूसाहेब मिसाळ,पत्रकार,माण
——————-