दहिवडी, 9 जानेवारी 2025: दहिवडी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र गळ्यातील स्कार्फ काढताना रस्त्यावर पडले होते. परंतु, दहिवडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या अर्ध्या तासात ते परत मिळाल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
सदर घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी जास्मिन निसार इनामदार या महिलेने दहिवडी बाजारपेठेत खरेदी करत असताना गळ्यातील स्कार्फ काढताना त्याला गळ्यातील मंगळसूत्र अडकून ते रस्त्यावर पडले . या घटनेची त्यांना बारामतीकडे परत जाताना पांगरी जवळ जाणीव झाली. याबाबत त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला माहिती दिली. महिलेच्या मुलाने त्वरित दहिवडी पोलीस ठाणे गाठले व सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना ही घटना सांगितली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाढवे यांनी वेळ न दवडता बाजारपेठ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या तपासणीत 15 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आली. एका फुटेजमध्ये एका अनोळखी महिलेला रस्त्यावर पडलेले मंगळसूत्र उचलताना अस्पष्टरीत्या दिसले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला. ती महिला परिसरातच असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली. तपासादरम्यान, सदर महिलेने मंगळसूत्र रस्त्यावर सापडल्याचे कबूल केले व ते पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
सदर मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेऊन तात्काळ मूळ मालकिणीला म्हणजेच जास्मिन इनामदार यांना परत दिले. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत केलेल्या या जलद आणि अचूक कामगिरीमुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.
सदर घटनेमुळे दहिवडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल दहिवडी आणि परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार रामचंद्र गाढवे त्यांची जलद आणि कुशल तपास पद्धती ही या यशामागील मुख्य कारण ठरली.