वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज….. उत्तमराव इंदलकर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
युवा पिढी सर्वगुणसंपन्न होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक उत्तमराव इंदलकर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचालित क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हसवड येथे विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य साखर संघाचे संचालक उत्तमराव इंदलकर, सहकारातील ज्येष्ठ नेते विकास गायकवाड उपस्थित होते,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.
यावेळी बोलताना उत्तमराव इंदलकर म्हणाले बदलत्या परिस्थितीमध्ये वाचाल तरच वाचाल ही म्हण अत्यंत खरी आहे.शालेय जीवनात वाचन तसेच अवांतर वाचन महत्त्वाचे आहे.वाचन संस्कृती जोपासली तरच युवक सर्वगुणसंपन्न होऊ शकतो.वाचनाचा छंद तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतो.अभ्यासाचे नियोजन करा, त्यामध्ये सातत्य ठेवा, जिद्द चिकाटी बाळगा, थोरामोठ्याचे चरित्र वाचून त्या माध्यमातून प्रेरणा घ्या.नेहमी सकारात्मक रहा.आपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करा.संघर्षातून वाटचाल करा. अडचणीवर मात करा व आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इंदलकर यांनी केले.

यानिमित्ताने इंदलकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग ,.राज्य लोकसेवा आयोग परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेने सीबीएसई पॅटर्न च्या माध्यमातून क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल ही माणदेशी युवकासाठी एक प्रकारची देणगी दिलेले आहे. या पॅटर्नचा उपयोग राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षेसाठी खात्रीशीरपणे होणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थी व पालकांना यांना केले. संस्था व शाळेच्या दर्जेदार व्यवस्थापनाबद्दल
इंदलकर यांनी गौरव उद्गार काढले.
बौद्धिक प्रगती, उपक्रमशीलता,खेळातील नैपुण्य इत्यादीमुळे या शाळेला उज्वल भविष्य असल्याचेही इंदलकर यांनी स्पष्ट केले.
संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
प्राचार्य राहुल फुटणे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षिका सुवर्ण टाकणे यांनी व्यक्त केले.