म्हसवड..प्रतिनिधी आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती टिकवण्यासाठी शालेय स्तरापासूनच खेळाची आवड जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक हिरालाल काटकर यांनी म्हसवड येथे केले. म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात क्रांती स्पोर्ट क्लब च्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी संस्था प्रमुख कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा शिक्षक हिरालाल काटकर, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विन्सेंट जॉन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हिरालाल काटकर म्हणाले यशस्वी विद्यार्थी व खेळाडू होण्यासाठी मन मनगट व मेंदू यांचा सुयोग्य समन्वय गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच विविध खेळांचे धडे देणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रीडा प्रशिक्षणाची गरज असते ही गरज क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने पूर्ण केलेली आहे. खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा शिक्षकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे काटकर यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना क्रीडा शिक्षक काटकर म्हणाले खेळामध्ये नियमित व्यायाम व कष्टाला पर्याय नाही. या निमित्ताने काटकर यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यायाम विषय क्लुप्त्या सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले खेळातूनच क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर भारतरत्न झाले . माणची सुकन्या ऑलिम्पिकपटू ललिता बाबर यांनी क्रांतिवीर संकुलास भेट दिली असून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे भाग्य येथील खेळाडूंना लाभले असल्याचे प्रा. बाबर यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक राहुल फुटाणे यांनी केले. या क्रीडा प्रशिक्षणाच्या निमित्ताने क्रिकेट,स्केटिंग, रोप स्किपिंग, आट्यापाट्या, सॉफ्टबॉल इत्यादी क्रीडा विषयक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्राचार्य विन्सेंत जॉन यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार तोरणे सर यांनी व्यक्त केले