गोडावून फोडून चोरलेली रोकड आणि बिस्किटांचा गुन्हा उघडकीस; एक आरोपी जेरबंद
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी : प्रतिनिधी
दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयाजवळील किराणा दुकानाच्या गोडावूनमधून २५ हजार रुपये रोख रक्कम व बिस्किटाचे बॉक्स चोरीस गेलेल्या प्रकरणाचा छडा लावत दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना १२ जूनच्या रात्री ८ वाजेपासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. गुरुप्रसाद मारुती मोरे (वय ३७, रा. मलवडी ता. माण) यांनी दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या दुकानाच्या गोडावूनमधील कुलूप तोडून २५,००० रुपये रोख रक्कम असलेली काळी बॅग व मॅरी बिस्किटाचे ६ बॉक्स (किंमत अंदाजे ₹५,०४०) चोरीस गेले होते.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १९९/२०२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पो. उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, पो. हवालदार रामचंद्र गाडवे, नितीन धुमाळ, पो. कॉ. निलेश कुदळे व अजिनाथ नरबट यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे सागर सुभाष चव्हाण (रा. दहिवडी, ता. माण) यास संशयावरून ताब्यात घेतले.
अर्जदाराकडून सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख ₹२५,००० जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र गाडवे हे करत आहेत.
दहिवडी पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असून चोरीच्या घटनांवर पोलिसांचा प्रभावी अंकुश असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.