जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – प्रयोगशील नाट्य निर्माते राहुल भंडारे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
गणेश तळेकर
जळगाव (प्रतिनिधी) :

व्यावसायिक असो वा हौशी नाटक त्यासाठी मुळात संहिता असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत चांगल्या नाट्यसंहितांची वाणवा असून, जुन्या जाणत्या लेखकांनी केलेले नाट्यलेखन समोर आल्यास, नवलेखकांना त्या सर्जनशीलतेचा वारसा अनुभवता येईल. या वारश्यातूनच उद्याच्या पिढीचे चांगले लेखक तयार होतील, असे प्रतिपादन अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल भंडारे यांनी केले. डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी पाच दशकांच्या
नाट्यकारकिर्दीत लिहिलेल्या २५ नाटकांपैकी निवडक १२ नाटकांचा ३ खंड रुपाने प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
वल्लभदास वालजी वाचनालयाच्या रामनारायण सभागृहात सोमवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजता या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.सुशील अत्रे तर प्रकाशक म्हणून अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल भंडारे यांच्यासह लेखक डॉ.हेमंत कुलकर्णी व श्रेयस प्रकाशनाच्या डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन झाल्यानंतर पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या २५ नाटकातील निवडक १२ नाट्यसंहितांचे तीन खंडात विभागलेल्या या पुस्तकात पहिल्या खंडात ७ आनंदाश्रम, बातमी तशी जुनी पण…, दास्ताँ, हम दो नो, दुसऱ्या खंडात मुसक्या, वेग्गळं असं काहितरी, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ तर तिसऱ्या खंडात पुन्हा तुर्क पुन्हा अर्क, अघटित, नेने विरुध्द शून्य, अनादी मी या नाटकांचा समावेश होता. तिसऱ्या खंडातील नव्या कोऱ्या प्रयोग न झालेल्या नाटकांविषयी डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी लेखकाच्या मनोगतात माहिती दिली. यातील ७ आनंदाश्रम, दास्ताँ, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ या नाटकातून अभिनय करणारे तसेच विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणारे हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील यांनी माहिती दिली तर मुसक्या व वेग्गळं असं काहितरी या नाटकाविषयी रंगकर्मी योगेश शुक्ल आणि हम दो नो, बातमी तशी जुनी पण… या नाटकांविषयी रंगकर्मी अम्मार मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रकाशक म्हणून डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रकाशक राहुल भंडारे यांनी त्यांची नाट्यविषयक वाटचालीबद्दल माहिती देत, नव्या दर्जेदार संहितांची गरज स्पष्ट करत, व्यावसायिक रंगभूमीवर केवळ प्रेक्षकशरण नाटके न होता प्रायोगिक मुल्य असणाऱ्या नाट्यप्रयोगाचेदेखील सादरीकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्यासारख्या विविधांगी विषय सखोलतेने मांडणाऱ्या नाट्यलेखकांची रंगभूमीला गरज असल्याचे विषद करत, लवकरच कुलकर्णी सरांचे या नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर होतांना दिसेल अशी आशाही व्यक्त केली.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुशील अत्रे यांनी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्यासोबत घडलेला नाट्यप्रवास सांगत, त्यांनी लिहिलेल्या नाटकांतील विषयांची संवेदनशीलता, त्यातील विचार मांडला. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता त्यातून प्रेक्षक अंर्तमुख होत विचार करायला लागेल अशी डॉ.कुलकर्णी यांची नाटके असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंगकर्मी धनंजय धनगर यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला जळगाव शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेक्षक व डॉ.हेमंत कुलकर्णी यांचे गेल्या पाच दशकातील नाट्यसहकारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!