म्हसवड…प्रतिनिधी काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या वाचाळ वीरावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हसवड पोलीस स्टेशन कडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांना दिले. यावेळी प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, माजी सभापती व जिल्हा एस. सी. विभागाचे उपाध्यक्ष विजय बनसोडे , जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, माण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज पोळ, युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला, ज्येष्ठ नेते अरुण बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आज देशात व महाराष्ट्रात लोकशाही धोक्यात आली आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना व संविधान संपवण्याचा कुटिल डाव भाजप व शिंदे गटाने चालवलेला आहे. अमेरिकेतील जॉर्ज टाऊन येथे राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत व्यक्त केलेल्या वाक्याचा विपर्यास करून तसेच मोडतोड करून भाजप व मित्र पक्षाचे वाचाळवीर समाज भडकविण्याचे व जातीय तेढ निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करीत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल ही सत्ताधाऱ्यांची प्रवृत्ती फोफावत चालली आहे . वाचाळवीर आमदार संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून सदर घटनेचा काँग्रेस तर्फे ठिकठिकाणीच्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित वाचाळ वीरावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रा. विश्वभर बाबर व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे