शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – नगराध्यक्षा पूजा विरकर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | प्रतिनिधी
शहराचा विकास हाच आपला ध्यास असून नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी नियोजनबद्ध व दर्जेदार कामे करण्यावर आपला भर असल्याचे प्रतिपादन म्हसवडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन (लक्ष्मण) विरकर यांनी केले. त्यांनी आज म्हसवड शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सविस्तर माहिती घेतली.
माण–खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री (भाऊ) यांच्या माध्यमातून म्हसवड शहरातील अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील विविध पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधांची कामे सध्या प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होऊन शहराच्या विकासात मोलाची भर पडणार आहे.
शहर व परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण विकास हाच मुख्य उद्देश असून, विकासकामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन कामकाज करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी संबंधित अधिकारी व ठेकेदार, म्हसवड नगरपालिकेचे कर्मचारी तसेच युवानेते सचिन (लक्ष्मण) वीरकर, शुभम लिंगे आदी उपस्थित होते.

