शिक्षणाचं व्यवसायिकरण की भाषेचं संकट? – शिक्षण क्षेत्र संक्रमण अवस्थेत!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
सातारा / कराड प्रतिनिधी
सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्र एका गंभीर संक्रमणातून जात आहे. शिक्षणाच्या मूलभूत उद्दिष्टांपासून दूर जाऊन, हे क्षेत्र हळूहळू व्यवसायिकरणाच्या मार्गावर चालत आहे. शिक्षण क्षेत्रातील या बदलांचे पडसाद केवळ गुणवत्ता, शाळांचे अस्तित्वच नव्हे तर भाषेवरही उमटताना दिसत आहेत.

प्राथमिक शिक्षण ही शिक्षणाच्या इमारतीची पायाभूत वीट असते. मात्र आज अनेक प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा नाहीत – ना चांगली इमारत, ना पुरेशी शिक्षणसामग्री. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍न निर्माण होत असतानाच, पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढलेला दिसतो. पण या शाळांमध्ये गुणवत्ता आहे का? शिक्षक पात्र आहेत का? याची खात्री कोण करणार?

पालक इंग्रजी भाषेतील दोन-चार वाक्यांवर खूश होतात आणि त्यातच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या भ्रमात राहतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. मराठी शाळांची संख्या महाराष्ट्रातच नव्हे तर गोव्यासारख्या ठिकाणीही घटते आहे. काही शाळा बंद पडल्या आहेत, काहींना विलग करण्यात आलं आहे.

त्रिभाषा सूत्रात हिंदीचा आग्रह आणि इंग्रजीच्या मागणीमुळे मराठीसारख्या मातृभाषेचा दर्जा कमी झाल्याची भावना समाजात रुजत आहे. शिक्षणव्यवस्था व्यवसाय बनत चालली आणि मातृभाषा दुय्यम ठरत गेली, हीच स्थिती भाषावादाला कारणीभूत ठरत आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

म्हणूनच आता गरज आहे ती शिक्षणाचे पाश्चिमात्य मॉडेल नाकारून, स्थानिक भाषेला सन्मान देण्याची. अन्यथा भारतीय संस्कृती, विचार, आणि कुटुंबव्यवस्थेवरही या संक्रमणाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. शिक्षण क्षेत्राचं हे संक्रमण रोखण्यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रादेशिक भाषेचे जतन आजच्या काळाची नितांत गरज आहे!

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *