आ. जयकुमार गोरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळी जनतेच्या वतीने धन्यवाद दिले. * कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर घेतली मुंबईत भेट *
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
खटाव, माणसह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी अतिरिक्त पाण्याची तरतूद करण्यासाठी फेर जलनियोजन करण्याचे निर्णय घेणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले. मुंबई येथे फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी दुष्काळी जनतेच्या वतीने धन्यवाद दिले.
अवर्षणप्रवण खटाव, माण, कोरेगाव आणि सातारा तालुक्यात शेती सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे गरजेचे होते. कृष्णा प्रकल्पाच्या पाणीवापरात होणाऱ्या बदलांमुळे पुनर्विलोकन करुन या प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन करण्याची मागणी केली जात होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीवडी येथील सभेत पाणी वापराचे फेरनियोजन करण्याचे संकेत दिले होते. तीन दिवसांपूर्वी महायुतीच्या सरकारने क्रांतीकारी निर्णय घेत कृष्णा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन करुन सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंभू योजनेचे दोन आणि इतर उपसा सिंचन योजनांसाठी दोन असे चार टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिले आहे.
उपलब्ध झालेल्या अतिरिक्त पाण्यामुळे माण, खटावसह चार तालुक्यांमधील शेकडो गावे नव्याने पाणी योजनांच्या लाभक्षेत्रात येणार आहेत. दुष्काळी भागातील जनतेला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाच्या व्यथा जाणून फेर जलनियोजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आ. गोरे यांनी त्यांचे आभार मानले.