“स्वच्छ नाना”चा “नाना”कडून गौरव – बालगंधर्व रंगमंदिरात टाळ्यांचा कडकडाट

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
राजा माने याजकडून
पुणे, दि. २७ मे (प्रतिनिधी) :
बॉलीवूडमधील आपल्या दमदार अभिनयाने आणि सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी समाजसेवेत कार्यरत असलेल्या “स्वच्छ नाना” म्हणजेच सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील इर्लेकर यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करून एक अविस्मरणीय क्षण घडविला.

बालगंधर्व रंगमंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात “निढळ – एक आदर्श गाव” या माहितीपटाच्या टीझरचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार होते. मात्र, नाना यांनी हा सन्मान स्वतः न स्वीकारता तो संतोष पाटील यांना दिला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचे स्वागत केले.

संतोष पाटील यांनी बार्शी तालुका कृषी पदवीधर संघटना व मातृभूमी प्रतिष्ठानसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचा एक नवा पॅटर्न उभा केला आहे. मागील २५ वर्षांत त्यांनी लातूर, सांगली, मुंबई इत्यादी ठिकाणी उच्च पदांवर कार्य करताना शेतकरी, सहकार, आणि कृषी धोरणांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वच्छ, साधे, आणि भ्रष्टाचारमुक्त अधिकारी म्हणून संतोष पाटील यांची ओळख आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवी निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकाराने झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवले गेलेले सातारा जिल्ह्यातील निढळ हे आदर्श गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

नाना पाटेकरांनी नानाचा गौरव केला, आणि उपस्थितांनी या अनोख्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद लुटला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!