दुष्काळी माण तालुक्यातील मुला मुलींना शिक्षण घेऊन पुढची वाट शोधल्याशिवाय पर्याय नाही,कष्ट, जिद्द चिकाटी ठेवा यश निश्चित आहे असे प्रतिपादन डॉ. बाबा दोलताडे यांनी केले.
कै. आबासाहेब पोळ शिक्षण सौस्थेच्या भालवडी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील निरोप समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौस्थेचे मार्गदर्शक विश्वस्त डॉ. संदीप पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. दोलताडे यांनी सांगितले की आपण सर्वजण दुष्काळी भागातील आहोत, आपली कुणाची पिढीजात श्रीमंती नाही व नव्हती, कष्ट करणारे आई वडील मिळाले हेच आपलं भाग्य आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला शाळा शिकवली त्यांचे उपकार कधीच विसरू नका. जीवनात उच्च ध्येय ठेवा, काय करणार आहे व काय करायचं आहे हे आजच ठरवा व त्या मार्गाने चाला मग तुम्ही यशस्वी होणार याची खात्री मी देतो असे त्यांनी सांगितले.
डॉ. संदीप पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईल पासून लांब रहा, चांगल्यासाठी काम करा, मित्रांची संगत चांगली ठेवा, आई वडिलांची, आठवण ठेवा, शिक्षक, शाळा, यांना कधीच विसरू नका, तरच भविष्यकाळ उज्ज्वल असेल असे त्यांनी सांगितले.यावेळी शिक्षक, विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच हिना मुलाणी, उपसरपंच नितीन शिंदे,माजी सभापती रमेश पाटोळे, आनंदराव पवार, सोपान निकम,गुलाबराव काटे, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी साळूंखे यांनी केले तर शिल्पा खासबागे यांनी आभार मानले