म्हसवड..प्रतिनिधी विद्यार्थ्यांनो यशाचे शिखर गाठायचे असेल तर चांगल्या स्वप्नाचा पाठलाग करा असे आवाहन लातूर शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही बी पाटील यांनी म्हसवड येथे केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे विद्यार्थ्यासाठी नीट व जेईई मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था प्रमुख कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्राध्यापक चंद्रकांत विभुते, प्राचार्य विठ्ठल लवटे मुख्याध्यापक अनिल कुमार माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य व्ही बी पाटील म्हणाले आजचे जग हे प्रचंड स्पर्धेचे जग आहे. इयत्ता दहावी बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असतो. याच वेळी राष्ट्रीय स्तरावरील नीट व जेईई परीक्षा असते. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेमधून वैद्यकीय पदवीच्यादेशातील एक लाख जागेसाठी अंदाजे 25 लाख विद्यार्थी परीक्षा देत असतात. वाढती लोकसंख्या व आरोग्य विषयक समस्येमुळे विविध वैद्यकीय शाखांना आजही प्रचंड महत्त्व आहे. पुढे बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने या कामी विविध शैक्षणिक उपक्रम राबवल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी प्राचार्य पाटील यांनी नीट व जेईई परीक्षेची तयारी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची जबाबदारी. विद्यार्थ्यांची कष्ट करण्याची तयारी, तसेच घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत यथोचित मार्गदर्शन केले तसेच अभ्यासाची संकल्पना स्पष्ट केली. इंजिनीयर व वैद्यकीय क्षेत्र म्हणजे सर्वस्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शालेय स्तरावर टीम वर्क महत्त्वाचे असून शिक्षकांना विद्यार्थ्यांचा चेहरा वाचता आला पाहिजे तरच त्याला योग्य मार्गदर्शन करणे सोयीचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. आज नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये प्रचंड वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नोकरी मागणारा पेक्षा नोकरी देणारे व्हा. जीवनात उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन हे पाटील यांनी केले. यावेळी संस्थापक प्रा. विश्वंभर बाबर यांनी प्रास्ताविक करून क्रांतीवीर संकुलातील उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले.