कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे विकासाचे श्रेय घेणाऱ्या निष्क्रिय आमदारांना घरी बसवा.: आम. जयकुमार गोरे….
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड कुलदीप मोहिते
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन रॅली जोरात सुरू असून, मतदारसंघात नव्या उमेदवारांची भेटीगाठी घेणे सुरू आहे. दररोज सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. या प्रचारात विकास आणि पाण्याचा प्रश्न यंदाच्या विधानसभेला महत्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसते.
काल वाठार किरोली येथे झालेल्या जाहीर सभेत माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गोरे म्हणाले, “कराड उत्तरच्या आमदारांना विकासकामे करण्याची संधी असूनही त्यांनी ती साधली नाही. मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. छोट्या गावांना देखील पाणी पुरवण्यात अपयशी ठरलेल्या आमदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.”
यावेळी गोरे यांनी महायुतीच्या माध्यमातून टेंभू योजनेचे पाणी पाठपुरावा करून दिल्याचा दावा केला. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या स्वप्नातील हंबरवाडी धनगरवाडी योजनेसाठीही अपयशी ठरल्याचे सांगितले.
सभेत ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत मित्र पक्षांची मते घेऊन त्यांच्याकडील कामे न करण्याचा आरोप केला.
या सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भीमराव पाटील, संजय घोरपडे, शंकर शेजवळ, दीपाली खोत आणि अनेक प्रमुख नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.