सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत पात्र पदवीधरांच्या झालेल्या पदोन्नती मधून चाफळ बीट साठी दोन महिला केंद्रप्रमुखांची निवड झाली आहे.चाफळ केंद्रासाठी रंजना पाटील वागजाईवाडी केंद्रासाठी सुरेखा जाधव यांची केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदरीतच केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी ते गटशिक्षणाधिकारी या पदावर महिला अधिकारी कामकाज पाहणार असल्याने चाफळ बिटात महिला राज आले आहे.
चाफळ बीटमध्ये चाफळ, वागजाईवाडी, नानेगाव व केळोली अशी एकूण चार केंद्र आहेत. या चार केंद्रांमध्ये सुमारे ४० पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा, चार माध्यमिक विद्यालये, इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकुल विद्यालयाचा समावेश होतो. यापूर्वी कार्यरत असलेले केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी या चारही केंद्राचा पदभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळत चाफळ बिटला चांगलेच वळण लावले होते.
चाफळ केंद्राला रंजना पाटील यांच्या रूपाने एक सक्षम व हुशार केंद्रप्रमुख लाभले आहेत. वागजाई वाडी केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या सुरेखा जाधव यांनी सुद्धा चाफळ बिटात उपशिक्षक म्हणून १३ वर्षे तर पात्र पदवीधर म्हणून २४ अशी एकूण ३७वर्ष सेवा बजावली आहे. तर चाफळ बिटासाठी भागशिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बेबी मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी पदी दीपा बोरकर या सक्षम अधिकारी संपूर्ण पाटण तालुक्याचा समर्थपणे कार्यभार सांभाळत आहेत. एकंदरीतच चाफळ बीटात महिलाराज आले असून काम चुकार शिक्षकांवर चाप लागणार हे मात्र नक्की.