पुण्यातील घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील बस स्थानके अलर्ट मोडवर, सुरक्षा उपाय वाढणार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
कराड
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण एसटी प्रशासन सतर्क झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये सुरक्षेची पाहणी व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासह मेढा, महाबळेश्वर, वाई, फलटण, दहिवडी, कराड, पाटण, लोणंद, शिरवळ, खंडाळा आणि कोरेगाव या स्थानकांचे सुरक्षा ऑडिट सुरू आहे. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या स्थानकांमध्ये प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षा उपाययोजना:
बसस्थानकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार
सीसीटीव्ही नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन
पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यावर भर
सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याचा निर्णय
महिला प्रवाशांसाठी विशेष चौकशी कक्ष सुरू करण्यात येणार आहे
सातारा आगारात २९ शिवशाही बसेस आहेत. मात्र, त्यातील काही बस वातानुकूलित यंत्रणा बंद असणे, हवेचा दाब कमी झाल्याने दरवाजे आपोआप उघडणे अशा तांत्रिक त्रुटींनी ग्रस्त आहेत. या त्रुटींचे निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा ऑडिटमध्ये स्क्रॅप बसचा वापर बंद करणे आणि त्या योग्य ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
एसटी महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रण अधिकारी रोहन पलंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व आवश्यक उपाययोजना केली जात आहेत. प्रवाशांनी कोणत्याही गैरप्रकाराची तक्रार दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.”