म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी जलदगती तपास करून पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. पाडळी (ता. सातारा) येथील गणेश शंकर ढाणे यांचा जॉईनडियर कंपनीचा 5210 मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर (एमएच 11 डीएन 9042) हा म्हसवड शहरात सुरू असलेल्या पाईपलाईन कामासाठी भाडोत्री लावलेला होता. याच ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर टँकरसह लंपास केला. या घटनेची तक्रार ढाणे यांनी तत्काळ म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवघ्या काही तासांत तब्बल 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांना आरोपींचा माग मिळाला.
दरम्यान चोरट्यांनी ट्रॅक्टरसह टँकर नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गाडीला वेग देता येत नसल्याने त्यांनी रस्त्यातच टँकर टाकून फक्त ट्रॅक्टर घेऊन पलायन केले. म्हसवड ते रहिमतपूर मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा धागा पकडत पोलिसांनी संशयितांचा मागोवा घेतला आणि रहिमतपूरमध्ये थेट आरोपींपर्यंत पोहोचले.
गौरव भागवत पवार, शिवराज नानासो पंडित आणि संदीप बाळकृष्ण कदम (सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी या आरोपींची नावे असून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नीता पळे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, युवराज खाडे व विकास ओंबासे यांनी या कामगिरीत मोलाचा वाटा उचलला.
अवघ्या 24 तासांत तब्बल 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणल्याने तक्रारदारासह म्हसवड परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.

