पाचगणी पोलीसांनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) श्री. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत हिरेजडीत अंगठी चोरीचा गुन्हा उघड केला. त्यांनी चोरलेल्या ७०,००० रुपये किमतीच्या हिरेजडीत दोन अंगठ्या हस्तगत केल्या. त्याचबरोबर दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत, एकूण ९०,००० रुपये किमतीच्या मोटरसायकली देखील परत मिळवल्या.
दि. १२.०९.२०२४ रोजी पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या इंदुबेन ठक्कर यांच्या रूममधून हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीस गेल्या होत्या. पाचगणी पोलिसांनी त्वरीत तपास कार्याला सुरुवात केली आणि माधव केशव लटपटे (वय २०) या आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या.
तसेच, मोटरसायकल चोरीच्या दोन घटनांत प्रितम सुनिल शिंदे (वय ३०) या आरोपीकडून ९०,००० रुपये किमतीच्या मोटरसायकली परत मिळवण्यात आल्या.
याशिवाय, पाचगणी पोलिसांनी वर्ष २०२४ मध्ये हरवलेले ३५ मोबाईल शोधून काढले आहेत, ज्यांची एकूण किंमत ५,१०,००० रुपये आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी सोनुने, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.