कराड येथे बो-माऊथ गिटार मास्याची बेकायदेशीर शिकार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उंब्रज (कराड) | प्रतिनिधी : कुलदीप मोहिते
वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल–१ भाग ‘E’ मध्ये समाविष्ट असलेला तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर **आय.यू.सी.एन.**कडून गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) घोषित करण्यात आलेल्या बो-माऊथ गिटार (Bowmouth Guitarfish) या दुर्मीळ मास्याची कराड परिसरात बेकायदेशीर शिकार करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी कराड येथील अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) तसेच सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांनी संबंधित मास्याचा व्हिडिओ प्रसारित करून त्याचे प्रदर्शन केल्याची माहिती वनविभागाला गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाने तातडीने कारवाई करत सदर दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, सुनिल शिंदे, तसेच वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील व मुकेश राऊळकर सहभागी होते.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून दुर्मीळ व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी वनविभाग सतर्क असल्याचा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे.

