भालवडीच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी ग्रामस्थांची मोठी अडचण दूर, स्मशानभुमिला जन सुविधा योजनेतून निधी
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी -: दौलत नाईक
भालवडी (ता. माण) येथील स्मशानभूमीचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून महत्प्रयासाने मार्गी लागून स्मशानभूमी पूर्णत्वास गेली आहे.
भालवडी या गावात अजूनपर्यंत स्मशानभूमी नव्हती. ग्रामस्थ जागा मिळेल तिथे मृतदेहावर अग्निसंस्कार करायचे. परंतू मागील काही वर्षांपासून अंत्यसंस्कार करण्यावरून वादविवाद सुरु झाले होते. जागा नसल्याने काही मृतदेहांवर ग्रामपंचायती समोर दहन करायचा प्रयत्न केल्याने महसूल प्रशासनाला पोलिस बंदोबस्तासह हस्तक्षेप करावा लागला होता. त्यामुळे गावात स्मशानभूमी असावी या मागणीने जोर धरला होता.
विद्यमान सरपंच हिना अयाज मुलाणी यांनी उपसरपंच गुलाब काटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक लक्ष्मण वाघमोडे यांच्या सहकार्याने स्मशानभूमीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र जागा नसल्याने अडचणी येत होत्या. १५ ऑगस्ट २२ रोजी गावातीलच गणेश नारायण पवार यांनी स्वमालकीची दोन गुंठे जागा स्मशानभूमीसाठी बक्षीस पत्र करून दिली. त्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला. ग्रामसभेत या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जन सुविधा योजनेतून यासाठी निधी मंजूर करण्यात आला.
सध्या सदर ठिकाणी स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून यामुळे ग्रामस्थांची मोठी अडचण दूर झाली आहे.