पोलिस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध!” – सपोनि दत्तात्रय दराडे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी प्रतिनिधी:
दहिवडी, वडूज, पुसेगाव, विटा, कराड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलीस असल्याचा बनाव करून, चेकिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः वयस्कर व्यक्तींनी सतर्क राहण्याचे आवाहन दहिवडी पोलिस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी केले आहे.
टोळीतील सदस्य “पोलिस आहोत”, “पुढे चेकिंग चालू आहे”, “तुमच्या मौल्यवान वस्तू एकत्र करून ठेवा” अशा सबबी सांगून हातचलाखीने लोकांकडील दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अशाच प्रकारच्या घटना यापूर्वीही परिसरात घडलेल्या असून यामध्ये मुख्यतः वयस्कर व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या घरातील वयोवृद्ध लोकांना या संदर्भात सतर्क करण्याचे आवाहन पोलीस पाटील व ग्रामस्थ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
याशिवाय महिलांना सोने पॉलिश करून देतो, असं सांगून घरात प्रवेश करणाऱ्या भामट्यांचाही सध्या सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडूनही हातचलाखीने मौल्यवान दागिने लंपास केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे महिलांनी अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करताना अंगावर दागिने घालू नयेत, असेही आवाहन सपोनि दत्तात्रय दराडे यांनी केले आहे.
संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित कळवा
कोणतीही संशयास्पद व्यक्ती गावात अथवा परिसरात दिसल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना देखील करण्यात आली आहे.