सेंट पिटर्सबर्ग (रशिया) येथे झालेल्या ग्लोबल इकॉnomिक फोरम समिटमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ध्यानधारणा प्रशिक्षक तथा नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. सुवर्णा यांना ‘ग्लोबल लिडर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सिटीटेल हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात ब्रिक्स सदस्य उद्योजक अॅन्ड्र्यू चिरवा यांच्या हस्ते डॉ. सुवर्णा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मिस रशिया वालेरिया मिर आणि सेंट पिटर्सबर्ग रिट्रीट सेंटरच्या डायरेक्टर बी.के. संतोष दीदी उपस्थित होत्या.
डॉ. सुवर्णा यांनी १४३ देशांतील ८,५०० हून अधिक सेवाकेंद्रांच्या माध्यमातून प्राचीन राजयोग ध्यानधारणा मोफत पोहोचविण्यास तसेच महिलांचे सशक्तीकरण, व्यसनमुक्ती आणि नैराश्यापासून संरक्षण यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १०० जागतिक विक्रम प्रस्थापित केले असून त्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही नोंदल्या गेल्या आहेत.
यापूर्वी त्यांना लंडनच्या ब्रिटिश संसदेत गौरव, दुबईतील इमिरेट्स एक्सलन्स अवॉर्ड, नेपाळमधील शांती पुरस्कार, थायलंडमधील इंडिया-थायलंड फ्रेंडशिप अवॉर्ड तसेच इंडिया ग्लोरी अवॉर्ड्स 2019-20 प्राप्त झाले आहेत. 2020 मध्ये जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानेही त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.
महाविद्यालयीन काळात ब्रह्माकुमारी संस्थेच्या संपर्कात आल्यापासून त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन ध्यानधारणा आणि मानवसेवेस समर्पित केले. “समाज व्यसनमुक्त, तणावमुक्त आणि सद्भावनायुक्त करण्यासाठी राजयोग सर्वोत्कृष्ट उपाय आहे,” असे त्या पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या.
डॉ. सुवर्णा यांच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.