सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची धडाकेबाज कामगिरी स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हसवड पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, ता. १५ ऑगस्ट :
स्वातंत्र्यदिन २०२५ निमित्त म्हसवड पोलिसांनी नागरिकांना खास भेट दिली आहे. तब्बल १६ लाख रुपये किमतीचे चोरी झालेले आणि हरवलेले ६१ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गेल्या सहा महिन्यांत म्हसवड पोलिसांच्या विशेष पथकाने २१ लाख रुपये किमतीचे एकूण ७८ मोबाईल फोन महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून शोधून परत केले आहेत.
या वेळी परत मिळवलेले मोबाईल महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांतून शोधून आणण्यात आले.
म्हसवड शहरातील मुख्य बाजारपेठ, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था तसेच बस स्थानक या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल चोरी जाण्याचे व गहाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्याने, पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली. CEIR पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विशेष पथकाने चिकाटीने शोध मोहीम हाती घेतली.
ही कारवाई मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडुज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मोबाईल शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पो. कॉ. विनोद सपकाळ, पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. कॉ. वसीम मुलाणी, पो. कॉ. नवनाथ शिरकुळे, म. पो. कॉ. पुनम जाधव तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. महेश पवार यांनी मोलाचे योगदान दिले.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

