व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड….प्रतिनिधी जॉर्डन देशातील ओमन येथे संपन्न झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या ओंकार बाबासाहेब काटकर या कुस्तीगिराचा क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. कुस्तीगीर ओंकार बाबासाहेब काटकर हा क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडचा माजी विद्यार्थी असून दिवड गावचा सुपुत्र आहे. 17 वयोगटाखालील 65 किलो गटात आशियाई कुस्ती स्पर्धेत ओंकार काटकर यांनी रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचा क्रांतिवीर शाळेत सत्कार आयोजित केला होता. देवापुरचे माजी सरपंच वस्ताद रामदास बाबर, चेअरमन वस्ताद आनंदा बाबर, वस्ताद बापूसाहेब काटकर, संस्था सचिव सुलोचना बाबर, शहाजी सावंत मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव यांच्या हस्ते ओंकार चा मानाचा फेटा व शाल श्रीफळ देऊन तसेच मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते.यावेळी क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी कुस्तीगीर सत्कारमूर्ती ओंकारच्या शाळेतील बालपणीच्या मजेशीर आठवणी कथन केल्या. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले माणची सुकन्या ऑलम्पिक पटू ललिता बाबर यांच्याप्रमाणेच कुस्तीगीर ओंकार काटकर यांनी सुद्धा यापुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवावे ही अपेक्षा व्यक्त केली. आशियाई पदक विजेत्या ओंकार चे यश तमाम माण वासिया साठी अभिमानाचे असून उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी स्पष्ट केले. यावेळी क्रांतिवीर संकुलातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी तर उपस्थितीचे आभार महादेव बनसोडे यांनी व्यक्त केले.