स्वेरीच्या अध्यक्षपदी अशोक भोसले; सचिवपदी प्रा. सुरज रोंगे – संस्थेच्या नवनिर्मितीसाठी नवे नेतृत्व सिद्ध

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला म्हसवड)
पंढरपूर (प्रतिनिधी – अदनान कल्याणी)
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ‘स्वेरी’ अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदासाठी नव्या नेतृत्वाची निवड नुकतीच पार पडली. अशोक भोसले यांची अध्यक्षपदी, सुरेश राऊत यांची उपाध्यक्षपदी तर प्रा. सुरज रोंगे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

१९९८ साली डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ‘स्वेरी’ संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार तंत्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, एम.बी.ए., एम.सी.ए. आणि पीएच.डी. सारख्या विविध शाखांमध्ये शिक्षण देणाऱ्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात ‘पंढरपूर पॅटर्न’च्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी अध्यक्ष दादासाहेब रोंगे, सी.बी. नाडगौडा आणि रामराव रिसवडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त अध्यक्ष अशोक भोसले म्हणाले, “ही निवड माझ्यासाठी सन्मानाची बाब असली तरी त्याहून अधिक मोठी जबाबदारी आहे. संस्थेचे शिक्षण, मूल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यावर आधारित कार्य अधिक बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

उपाध्यक्ष सुरेश राऊत यांनी “स्वेरी ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण असून संस्थेचा नावलौकिक अबाधित ठेवत प्रगतीसाठी एकजुटीने काम करू,” असे सांगितले. तर सचिव प्रा. सुरज रोंगे म्हणाले, “शून्यातून निर्माण झालेल्या या संस्थेला नवे आयाम मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. संस्थापकांनी घेतलेली मेहनत व मूल्ये आम्हाला सदैव प्रेरणा देतील.”

मावळते सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. आपला अनुभव शेअर करताना त्यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि स्वप्नांची उजळणी करत सांगितले की, “अल्पसाधनांतून उभारलेली ही संस्था आज प्रगल्भ अवस्थेत पोहोचली असून शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या प्रगतीसाठी मी कार्यरत राहीन.”

या कार्यक्रमास स्वेरीचे सर्व विश्वस्त, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, कॅम्पस इन्चार्ज, विभागप्रमुख, अधिष्ठाता आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या या नव्या पर्वाला सुरुवात करताना सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *