इंदापुर तालुक्यातील उजनी जलाशयात परदेशी पक्षांचे आगमन.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर :प्रतिनिधी
परदेशातील दूरच्या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशयाच्या विस्तिर्ण अशा पाणलोट परिसरातील क्षेत्रात स्थलांतर करून रोहित (फ्लेमिंगो) पक्षी दाखल झाले आहेत. हिवाळ्यात गुलाबी थंडीच्या गुलाबी पंखांना उजनी जलाशयाची मोठी आस आहे. त्यामुळेच एवढा मोठा प्रवास करून ते या क्षेत्राच्या आश्रयाला येतात.
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशय ‘रोहित’ (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे वास्तव्याचे प्रमुख ठिकाण आहे. विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तव्य उपयोगी गोष्टी असल्याने पक्षी आपल्या ‘वसाहती’ थाटतात. मध्य आशिया तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये त्यांना लागणाऱ्या अन्नाची कमतरता निर्माण झाल्यानंतर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. साधारणतः प्रतिवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान प्लेमिंगो भारतामध्ये येऊन निरनिराळ्य़ा ठिकाणी वास्तव्य करतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके, पानकोंबडी, चित्रबलाक, चांदवा, चमच्या, जांबळी, तलवार, राखीबगळा वेडर्ससह शेकडो विविध प्रकारच्या ३०० प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथे मुक्कामी येत आहेत. विणीचा हंगाम असल्यामुळे पाणथळ व सुरक्षित ठिकाणी अनेक पक्षी पिलांना जन्म देतात . उजनी धरणावर येऊन पक्ष्यांना पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ जुना पूल, पळसदेव या परिसरात हमखास फ्लेमिंगो पाहायला मिळतात. उजनी जलाशय परिसरात विशेषतः डिकसळ, कुंभारगाव या पट्ट्यातही प्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसून येतात. जलाशयातील पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होत असलेल्या दलदलीत त्यांचे विशिष्ट असे खास खाद्य निर्माण होत असते. यामध्ये शेवाळ, पानवनस्पती, किडे हे खाद्य खऱ्या अर्थाने ही एक प्रकारची मेजवानीच असते. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. पाण्यामध्ये पांढऱ्या आणि गुलाबी छटा असलेल्या या पक्ष्यांचा थवा, लांबलचक गुलाबी पाय, पांढऱ्याशुभ्र पंखाच्या खाली भडक काळी-गुलाबी छटा, उंच मान आणि अणकुचीदार चोच यामुळे हे पक्षी देखणे दिसतात. सूर्योदयापूर्वी या पक्षांचे थवे
तलावावर दाखल होतात आणि खाद्य शोधण्याची लगबग सुरू होते. एकमेकांना मानेने ढुशा देत, चिखलात चोच रुतवून ते खाद्य मिळवतात. यावेळी क्द्रा…, क्त्रा.. अशा आवाजाचा गलका करत भक्ष्य पकडणाऱ्या प्लेमिंगोचे दृश्य पाहण्याजोगे असते. ऊन पडल्यानंतर ते पाण्यातच आराम करतात. ते
आपली उंच मान दुमडून पंखांच्या खाली खोचतात.दिवसभर मौज-मस्तीनंतर सूर्यास्तावेळी पुन्हा पक्षी हवेत झेपावतात. एका मागोमाग एक असा शिस्तबद्ध उडणाऱ्या या पक्ष्यांचा हा थवा थक्ककरणारा असतो. देशातील अनेक पक्षितज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन पक्ष्यांची पाहणी केली आहे उजनीचा पट्टा इंदापूर तालुक्यास पाणी व स्थलांतरित पक्ष्यांमुळे वरदान ठरला आहे. गेली तीन दशके हे पक्षी येथे येत आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनाला मोठी संधी आहे. पक्षी निरीक्षण केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र आणि प्राणिसंग्रहालय
उभारून पर्यटकांना इकडे आकर्षित करता येऊ शकते. तसेच जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही महत्त्व आहे.