वारकऱ्यांच्या सेवेत “आरोग्य वारी” उपक्रम: म्हसवडमध्ये भाविकांचे वैद्यकीय तपासणी व फराळ वाटपाने स्वागत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड (प्रतिनिधी) –
सातारा-पंढरपूर वारी मार्गावरून पंढरपूरकडे चालत जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी म्हसवड नगरीत “आरोग्य वारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधाता सामाजिक संस्था म्हसवड, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड व प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 30 जून व मंगळवार, दि. 1 जुलै रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, तसेच फळे व फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. म्हसवड शहरातील शिंगणापूर चौक येथे या सेवांचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी वैद्यकीय पथक 24 तास कार्यरत असणार आहे.
“पाऊले चालती पंढरीची वाट…” या श्रद्धेच्या वाटेवर चालत असलेल्या भाविकांचे स्वागत करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हीच खरी वारीची सेवा, असा भाव या उपक्रमामागे आहे.
विधाता सामाजिक संस्था व आरोग्य केंद्रांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना हार्दिक स्वागत व सेवा प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व संस्थांचे समाजातून कौतुक होत आहे.