औंधसह 21 गावांच्या सिंचन योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढली आहे. श्री यमाई देवी, श्री सिद्धेश्वर आणि सद्गुरु परमहंस यशवंत बाबांच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या पाठिंब्याने, येत्या काही दिवसांत ही योजना मंजूर होईल, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागात पाणी उपलब्धता वाढून शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळेल. गोरे यांनी या योजनेला “दुष्काळमुक्तीसाठी शेवटची लढाई” असे म्हटले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सिद्धेश्वर कुरोली व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांचे आभार मानत म्हटले की, “गेल्या निवडणुकीत तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिले होते, यावेळीसुद्धा तुमचा पाठिंबा मिळावा अशी आशा आहे.”
गोरे यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, या सिंचन योजनेच्या मंजुरीमुळे परिसरातील गावांची दुष्काळापासून मुक्तता होईल आणि शेतीला नवसंजीवनी मिळेल. या भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळवून विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. गोरे यांनी स्पष्ट केले की, या योजनेसाठी अनेक वर्षांपासून ते प्रयत्नशील होते, आणि आता हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी कमळ चिन्हासमोरचे बटन दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे. “या भागातील सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी, आणि तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुमचा आशीर्वाद आणि साथ लाभल्यास औंध सह 21 गावांचे भाग्य बदलण्यास आम्ही कटीबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
या घोषणेमुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे परिसरात एक नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.